‘वीरपत्नी’ आजींना सॅल्यूट; १० किमी चालत जाऊन PM Cares फंडासाठी दिले २ लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 21:20 IST2020-05-16T21:19:31+5:302020-05-16T21:20:39+5:30
शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला.

‘वीरपत्नी’ आजींना सॅल्यूट; १० किमी चालत जाऊन PM Cares फंडासाठी दिले २ लाख रुपये!
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक देशवासीयानं योगदान देणं गरजेचं आहे. घरातच थांबणं, घरच्यांची काळजी घेणं, गरीब-मजुरांना सांभाळून घेणं अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते भरीव आर्थिक मदत करणं, कोरोना वॉरियर म्हणून प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्यापर्यंत अनेक माध्यमांतून आपण या लढ्यात सहभागी होऊ शकतो. तसा, असंख्य जणांनी आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलून या संकटातून देशाला सावरण्याचा प्रयत्न केला आहे – अजूनही करत आहेत. या योद्ध्यांचं – दानशूरांचं मनोधैर्य वाढवणारं, त्यांना नवी उमेद देणारं एक आदर्श पाऊल ८० वर्षांच्या आजींनी उचललंय.
वीरपत्नी दर्शनी देवी या उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील डोभा-डडोली गावात राहतात. शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला. त्यानंतर, त्या गावात परत आल्या आणि नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी हरेंद्र चौहान यांच्याकडे त्यांनी डीडी सुपूर्द केला. त्यांचं हे दातृत्व पाहून अधिकारी भारावले आणि त्यांनी आजींचा हार घालून सत्कार केला. आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनमधून बचत म्हणून बाजूला ठेवलेली ही रक्कम आजींनी देशहितासाठी दिली. त्यासाठी त्यांना १० किलोमीटर अंतर चालावं लागलं, पण थकव्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच अधिक होतं.
दर्शनी देवी यांचे पती कबूतर सिह रौथाण हे १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते. अपत्य नसल्यानं त्या एकट्याच राहत आहेत आणि देशप्रेमाचा वसा समर्थपणे चालवत आहेत. कोरोना विषाणूनं पूर्ण जगात थैमान घातलंय आणि देशातील जनताही या संकटाशी सामना करत असल्याची चर्चा गावात होत असते. अशावेळी बरेच जण सढळ हस्ते केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करत असल्याचं समजलं आणि मी माझ्या परीने योगदान देण्याचा निर्णय घेतला, असं आजींनी सांगितलं. त्यांनी दाखवलेली जिद्द आणि दान देण्याची वृत्ती आजच्या काळात खरोखरच प्रेरणादायी आहे.
(फोटो सौजन्यः सोशल मीडिया)