Coronavirus: २०२० मध्ये भारतात ८२ लाख लोकांचा मृत्यू, त्यापैकी एवढे कोरोनाबळी, धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:05 AM2022-05-04T10:05:25+5:302022-05-04T10:22:06+5:30
Coronavirus In India: गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
नवी दिल्ली - गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. दरम्यान, कोरोनाकाळात भारतामध्ये नेमके किती मृत्यू झाले याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात ८१.२ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०१९ च्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण ६.२ टक्क्यांनी अधिक होते. २०१९ मध्ये भारतात ७६.४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. २०२०२ मध्ये कोरोनामुळे भारतात १ लाख ४८ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर २०२१ मध्ये तब्बल ३ लाख ३२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२० पासून आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ५ लाख २३ हजार ८८९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाकाळात देशात मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. तसेच २०१९ च्या ७६.४ लाखांवरून ते ८१.२ लाखांपर्यंत पोहोचल्याचे दिसले.
महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा येथील मृत्यूचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढलेले दिसले. या राज्यांमध्ये कोरोनामुळे बहुतांश मृत्यू झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या काळातील जन्मनोंदणीवरून देशातील जन्मदर घटल्याचे दिसून आले. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदरात २.४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये भारतात २ कोटी ४८ लाख मुलांच्या जन्माची नोंद झाली होती. तर २०२० मध्ये २ कोटी ४२ लाख जन्मांची नोंद झाली.