Coronavirus: कोरोनाचे नवे ८३ टक्के रुग्ण महाराष्ट्रासह ६ राज्यांत; रुग्णवाढीने चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 07:13 AM2021-03-22T07:13:45+5:302021-03-22T07:14:08+5:30
केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये अधिक खबरदारीच्या सूचना
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांमधील ८३.१४ टक्के महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या राज्यांत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक २७ हजार १३६, पंजाब २ हजार ५७८ आणि केरळमध्ये २ हजार ७८ नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकमध्ये १ हजार ७९८, गुजरातमध्ये १ हजार ५६५ तर मध्य प्रदेशमध्ये १ हजार ३०८ नवे बाधित आढळले आहेत. हा संसर्ग वाढू लागल्याने पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यात शाळा बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणि लॉकडाऊनसारखे निर्बंध पुन्हा लागू करावे लागत आहेत.
रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागे नागरिकांकडून कोरोना निर्बंधांचे पालन करण्यात होत असलेली उदासिनता हेच असल्याचे दिसून येत आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, नागरिकांना सध्या कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला असे वाटत आहे. खरेतर लोकांनी आणखी काळ गरज नसताना प्रवास करणे टाळले पाहिजे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोना निर्बंध काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना तपासणी चाचण्यांचा प्रमाण वाढवण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून काढण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.