Coronavirus: भारतातील ८६ टक्के मृतांमध्ये एक गोष्ट समान; आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 07:37 AM2020-04-08T07:37:56+5:302020-04-08T07:38:13+5:30
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्ट करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली: भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,४२१ वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी ३५४ नव्या लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहितीआरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली होती. तसेच आतापर्यत ११४ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
लव अग्रवाल यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ३० टक्के रुग्णांचे वय ४० ते ६० या दरम्यान होते व ७ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.
60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यचं प्रमाण 37 टक्के असलं तरी 86 टक्के लोकं अशी आहेत, ज्यांना आधीपासून कोणता ना कोणता आजार होता. त्यामुळे ज्या तरुणांना असे आजार आहेत त्यांना कोरोनाव्हायरसचा धोका आहे. त्यामुळे अशा तरुणांनी विशेष काळजी घ्यावी अशी विनंती लव अग्रवाल यांनी केली. तसेच भारतात महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाव्हायरचा प्रभाव जास्त आहे. भारतात आतापर्यंत 76 टक्के पुरुषांना कोरोनाची लागण झाली असून मृतांमध्येही 73 टक्के पुरुष आहे, असं लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.
देशात आतापर्यंत 1,07,006 टेस्ट -
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) रमन गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोनाच्या 1,07,006 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या 136 सरकारी प्रयोगशाळांमध्ये काम सुरू आहे. तसेच 59 खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्यात आली आहे.