CoronaVirus : देशातील ९७ टक्के कोरोना रुग्ण झाले बरे; ३ लाख ८५ हजार उपचाराधीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 06:55 AM2021-08-16T06:55:08+5:302021-08-16T06:55:32+5:30
CoronaVirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत.
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत ३६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले व आणखी ४९३ जण मरण पावले. एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ९७.४७ टक्के लोक बरे झाले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून ती ३ लाख ८५ हजारांवर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ३३६ आहे. सर्व कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत गेल्या चोवीस तासांत आदल्या दिवशीपेक्षा २,३३७ ने वाढ झाली, तसेच ३५,७४३ रुग्ण बरे झाले. मागील ४९ दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा कमी आहे. देशातील दररोजचा संसर्गदर १.८८ टक्के आहे. सलग वीस दिवस हा संसर्गदर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दर आठवड्याचा संसर्गदर २ टक्के, तसेच कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३४ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ३१ हजार २२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मागील चोवीस तासांत देशभरात ७३ लाख ५० हजार ५५३ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. आजवर ५८.३८ कोटी डोस नागरिकांना दिले आहेत. देशात चोवीस तासांत केरळमध्ये सर्वाधिक १९,४५१ नवे रुग्ण सापडले. त्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये ५,७८७, तामिळनाडूमध्ये १,९१६, कर्नाटकमध्ये १,६३२, आंध्र प्रदेशमध्ये १,५३५ नवे रुग्ण आढळले. नव्या रुग्णांपैकी ८४.०३ टक्के रुग्ण या पाच राज्यांत आहे. त्यातील ५३.९१ टक्के नवे रुग्ण एकट्या केरळमध्ये आहे.
जगात २० कोटी ७५ लाख कोरोना रुग्ण
जगभरात २० कोटी ७५ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील १८
कोटी ६० लाख रुग्ण बरे झाले. १ कोटी ७१ लाख जणांवर उपचार सुरू आहेत व त्यातील १ लाख ६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेमध्ये ३ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून, त्यातील ६६ लाख जणांवर उपचार सुरू आहेत, तसेच ६ लाख ३७ हजार लोकांचा बळी गेला आहे.