CoronaVirus News: चिंताजनक! देशात आतापर्यंत ९९ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी; मृत्यूदर १० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 09:39 PM2020-07-15T21:39:12+5:302020-07-15T21:42:27+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'रेड अलर्ट'; डॉक्टरांना काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई - दिवसेंदिवस देशासह राज्यातील कोरोनाचा कहर वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा नऊ लाखांच्या पुढे गेला आहे. अशात आता कोरोना योद्धे अर्थात डॉक्टरच मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या ९९ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर १ हजार ३०९ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के असल्याने आयएमएने यावर चिंता व्यक्त केली आहे. तर आता आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५८६ प्रॅक्टिशनर डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर, १00 हाऊस सर्जन आहेत. तर यातील ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक ७३ मृत्यू हे ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांचे झाले असून, ही टक्केवारी ७५ टक्क्यांच्या घरात आहे. तर ३५ वर्षापर्यंत सात तर ३५ ते ५0 वयोगटातील १९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे डॉक्टरांच्या झालेले मृत्यू शंभराच्या टप्प्यावर असल्याने डॉक्टरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी करत डॉक्टरांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केल्याची माहिती आयएमए सदस्य आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. डॉक्टर योग्य ती खबरदारी घेत आहोत. पण तरीही अनेक डॉक्टर कोरोनाचा संसर्ग होत आहेत, काहींचा बळी जात आहे. तेव्हा पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे आता सरकारने पीपीई किटच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही डॉ. उत्तुरे यांनी केली.
कोरोनाबाधित डॉक्टर १ हजार ३०२
मृत्यू ९९
वयोगटनिहाय मृत्यू मृतांचा आकडा
३५ वर्षांहून कमी ७
३५ ते ५० १९
५० वर्षांहून अधिक ७३
एकूण ९९
बाधितांची संख्या
प्रॅक्टिसिंग डॉक्टर ५८६
निवासी डॉक्टर ५६६
हाऊस सर्जन १५०
एकूण १३०२