CoronaVirus News: संपूर्ण देशासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोना रुग्णांबद्दलची दिलासादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:16 AM2020-10-06T02:16:49+5:302020-10-06T06:44:16+5:30
CoronaVirus News: देशात रुग्णसंख्या ६६ लाख; बरे झाले ५५ लाख
नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून देशामध्ये बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, त्यामुळे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या आत कायम राहिली आहे. देशामध्ये सोमवारी कोरोनाचे ७४,४४२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या ६६ लाखांवर पोहोचली आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५५ लाख ८६ हजार झाली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९०३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या १,०२,६८५ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ९,३७,६३५ होती, ती सोमवारी कमी होऊन ९,३४,४२७ झाली आहे.
कोठे किती बळी?
कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,७८४, उत्तर प्रदेशमध्ये ६,०२९, आंध्र प्रदेशात ५,९८१, दिल्ली ५,५१०, पश्चिम बंगालमध्ये ५,१९४, पंजाबमध्ये ३,६०३, गुजरातमध्ये ३,४९६ इतकी आहे. एकूण बळींपैकी ७० टक्के लोक अधिक व्याधींनी ग्रस्त होते.
चाचण्या ८ कोटींजवळ
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी ९,८९,८६० कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,९९,८२,३९४ झाली आहे.