CoronaVirus १४ एप्रिलनंतर काही ठिकाणी टाळेबंदी कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:59 AM2020-04-06T04:59:29+5:302020-04-06T05:00:30+5:30
दोन विभाग पाडून करणार कोरोनासाथीचा मुकाबला
नवी दिल्ली : कोरोना साथीपायी पुकारलेल्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला संपत असून त्यानंतर या देशात साथीची मोठ्या प्रमाणावर लागण झालेले विभाग व प्रतिरोधक विभाग (बफर झोन), असे दोन विभाग केंद्र सरकारकडून पाडण्यात येतील. तेथील कोरोनाची साथ संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. या दोन विभागांमध्ये काही ठिकाणी टाळेबंदी हटविली जाईल तर काही ठिकाणी कोरोनाचे निर्मूलन होईपर्यंत ती कायम राहाणार आहे.
२००९ साली आलेली एच१एन१ची साथ एका शहरातून दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या तुलनेत या साथीने ग्रामीण भागात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांत इतका हाहाकार माजविला नव्हता. हे उदाहरण डोळ््यासमोर असल्यामुळे कोरोनाशी मुकाबला करताना देशातील विविध भागांमध्ये तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे धोरण केंद्र सरकार अवलंबणार आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, जिथे लोकसंख्या जास्त व कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर आहे तिथे घातलेल्या निर्बंधांचे अतिशय कडक पालन केले जाईल. अशा ठिकाणची टाळेबंदी १४ एप्रिलनंतरही उठविली जाणार नाही. देशात कोरोना विषाणूची साथ अजूनतरी नियंत्रणात असून ती सुदैवाने सामुहिक संसर्गाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली नाही. टाळेबंदीची मुदत संपेपर्यंत जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर केंद्र सरकार दोन विभाग पाडून आपले काम सुरू करेल.
क्वारंटार्ईनची क्षमता वाढविणार
च्कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेल्या विभागांमध्ये अधिकाधिक रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठीपूर्वतयारी सुरूआहे. प्रतिरोधक विभागांमध्ये कोरोनाच्या एकेका रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचारांची दिशा ठरविण्यात येईल.
च्या दोन्ही विभागांत बाहेरून कोणालाही येऊ दिले जाणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी व सार्वजनिक सेवांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.
च्या विभागांत जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा होण्यासाठी संबंधित व्यापारी, वाहतूकदारांना पास दिले जातील. तेथील शाळा व महाविद्यालये बंद राहणार असून सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी असणार आहे. साथीचे अस्तित्व संपेपर्यंत ही बंधने कायम राहणार आहेत.