coronavirus: एम्सच्या महासंचालकांनी कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८० टक्के रुग्णांना आरोग्याबाबत दिला गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 02:01 PM2020-09-10T14:01:01+5:302020-09-10T14:56:22+5:30
एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अनेक बाधित लोक कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत अशा कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
मुंबई - देशातील कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अनेक बाधित लोक कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत अशा कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे अनेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र असे असले तरी कोविड-१९ ला गांभीर्याने न घेण्याची चूक करू नका, कारण कोरोनावर मात केल्यानंतरही ६० ते ८० टक्के लोकांमध्ये काही ना काही समस्या दिसून येत आहेत. ही समस्या अंगदुखीसारखी सामान्यही असू शकते. मात्र चिंतेची बाब म्हणजे काही रुग्णांमध्ये फुफ्फूस आणि हृदयासंबंधीच्या समस्याही दिसून येत आहेत.
नॅशनल ग्रँड राऊंड -७ ऑनलाइन कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोनानंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी डॉक्टरांनी सज्ज राहावे, असा सल्ला त्यांनी दिला. ते म्हणाले, कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांची फुप्फुसे कमकुवत होत आहेत. त्यामुळे त्यांना दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनची गरज भासू शकते. अशा रुग्णांच्या फुप्फुसामध्ये फाइब्रोसिसची गंभीर समस्या दिसून येत आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची फुप्फुसे खराब झाली होती. त्यांना फुप्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला आहे. हल्लीच यापैकी एका रुग्णावर फुप्फुस प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया झाली आहे.
तसेच कोरोनामुळे काही रुग्ण स्ट्रोकची शिकार झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक रुग्णांच्या जीवनमानावर परिणाम झालेला दिसत आहे. तसेच अनेक कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हृदयरोगासारख्या समस्या दिसून येत आहेत, असेही गुलेरिया यांनी सांगितले.
देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक, पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी
देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाय केले जात असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा 24 तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल 44 लाखांवर पोहोचली असून पुन्हा एकदा हादरवणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 44,65,864 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 75062 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 95,735 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 लाख 65 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 हजारांवर पोहोचला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी