CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:49 PM2020-05-30T15:49:00+5:302020-05-30T15:53:19+5:30
CoronaVirus: एअर इंडियाच्या छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती, पण सुदैवानं ती टळली आहे.
नवी दिल्लीः एअर इंडियाच्या विमानानं शनिवारी सकाळी दिल्लीहून रशियासाठी उड्डाण घेतलं, पण उड्डाणादरम्यान विमानाला पुन्हा माघारी बोलवावं लागलं आहे. विमानातील वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि लागलीच विमानाला परत बोलवण्यात आलं. एअर इंडियाच्या छोट्याशा चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती, पण सुदैवानं ती टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी क्रू मेंबरचा अहवाल पाहिला असता तो चुकून निगेटिव्ह असल्याचं अधिकाऱ्यांना वाटलं, पण दोन तासांनंतर पुन्हा एकदा तो अहवाल व्यवस्थित पाहिल्यानंतर वैमानिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यानंतर विमानाशी एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) मार्गे संपर्क साधण्यात आला आणि विमानाला परत आणावं लागलं. हे विमान रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशात घेऊन येणार होते. त्यामुळे फ्लाइटमध्ये फक्त क्रू मेंबर्स आणि वैमानिक होते.
विमानाला माघारी बोलावण्याचा निरोप मिळाला, त्यावेळी ते उझबेकिस्तानच्या आकाशात होते. एअरबस ए -320 हे विमान 12 वाजून 30मिनिटांनी दिल्लीत परतलं आहे. नियमानुसार क्रू मेंबर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आता या विमानाला सॅनिटाइज केलं जाणार आहे. रशियामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दुसरं विमान पाठवण्यात येणार आहे. वंदे मातरम् मिशन अंतर्गत एअर इंडिया परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणत आहे. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोक वेगवेगळ्या देशांकडून परत आले आहेत, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी देशात परतण्यासाठी नोंदणी केली आहे.