coronavirus : 4 मेपासून एअर इंडियाचे विमान झेपावणार, बुकिंग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:56 PM2020-04-18T22:56:30+5:302020-04-18T22:57:32+5:30
लॉकडाऊनमुळे देशातील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे.
नवी दिल्ली - देशात फैलावत असलेले कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक लॉकडाऊनमुळे 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरू करण्याची तयारी एअर इंडियाने सुरू केली आहे. तसेच 4 मे पासूनच्या देशांतर्गत विमानवाहतुकीसाठी तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे. एअर इंडियाने आपल्या वेबसाईटवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
वेबसाईटवर दिलेल्या माहितीत एअर इंडियाने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या देशव्यापी संकटाचा विचार करून आम्ही देशांतर्गत विमान उड्डाणे 3 मे पर्यंत स्थगित केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठीचे तिकीट बुकिंग 31 मेपर्यंत स्थगित केले आहे. मात्र 4 मेपासून काही ठराविक मार्गांवर आणि 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठीचे तिकीट बुकिंग सुरू केले आहे.