Coronavirus : ‘जनता कर्फ्यू’मध्ये विमान कंपन्याही होणार सहभागी, एक हजारांहून अधिक उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 04:02 AM2020-03-22T04:02:32+5:302020-03-22T07:06:33+5:30
Coronavirus : जनता कर्फ्यूच्या काळात विमान कंपन्यांनी एक हजारांहून अधिक उड्डाणे बंद ठेवण्याचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : कोरोनाची देशभर लागण होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या, रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रेल्वेने जशा दूरपल्ल्याच्या सर्व गाड्या रद्द केल्या आहेत, तसेच विमान कंपन्यांनी रविवारी अनेक उड्डाणेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जनता कर्फ्यू सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या काळात रेल्वेची कोणतीही नवी गाडी कुठूनही निघणार नाही. ज्या गाड्या आधीच निघाल्या आहेत, त्या मात्र ठरलेल्या स्थानी पोहोचतील. त्यामुळे गाड्यांमधील प्रवाशांना मध्येच अडकून राहावे लागणार नाही. रेल्वेने दूर पल्ल्याच्या ४ हजार गाड्या रद्द केल्या आहे. आम्ही जनता कर्फ्यूच्या काळात नवी गाडी सोडणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
जनता कर्फ्यूच्या काळात विमान कंपन्यांनी एक हजारांहून अधिक उड्डाणे बंद ठेवण्याचे ठरविले आहे. इंडिगो आणि गोएअर या विमान कंपन्यांची एक हजारांहून अधिक विमाने या काळात जमिनीवरच असतील. गोएअरने म्हटले आहे की, रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आमचे एकही विमान उड्डाण करणार नाही. इंडिगोने सरसकट उड्डाणे बंद केलेली नाहीत. मात्र इंडिगोची नेहमीपेक्षा ६0 टक्के विमानेच उद्या उड्डाण करतील. याचाच अर्थ कर्फ्यूच्या आधी वा नंतर या कंपनीची विमाने सुरू राहतील.
पैसे परत करणार?
इतकी उड्डाणे रद्द करण्यात आली असली तरी त्याची आधीच तिकिटे काढलेल्या प्रवाशांना पैसे परत करणार, की नंतर त्याच तिकिटाने प्रवास करता येईल, हे विमान कंपन्यांनी स्पष्ट केलेले नाही.