coronavirus: अमित शाह म्हणाले, कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:29 PM2020-06-08T18:29:33+5:302020-06-08T18:32:27+5:30
कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधकांनी सांगावे, त्यांनी काय केलंय ते, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे.
नवी दिल्ली - लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधकांनी सांगावे, त्यांनी काय केलंय ते, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच भाजपाने व्हर्च्युअल रँलींना सुरुवात केली आहे. त्यादरम्यान आज ओदिशामधील जनसंवाद रँलीला अमित शाह यांनी संबोधित केले. त्यावेळी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, कोरोनाशी लढताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधी पक्षाने सांगावे की, त्यांनी या काळात काय केलं आहे ते. कुणी स्वीडनमधील तर कुणी अमेरिकेतील लोकांशी चर्चा करत आहे. या चर्चेपलीकडे तुम्ही काय केले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्वरित मदत म्हणून १.७ लाख कोटी रुपयांचे गरजूंमध्ये वाटप केले आहे. तसेच या काळात सुमारे तीन लाख उडिया बांधवांना देशातील विविध भागांतून परत आणले आहे. त्यांची सुरक्षा आणि घरवापसीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रमिक ट्रेन चालवल्या.
#WATCH Union Home Minister & BJP leader Amit Shah addresses ‘Odisha Jan-Samvad Rally’ through video conferencing https://t.co/Fx3W6BukuM
— ANI (@ANI) June 8, 2020
यावेळी अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाचे राजकारण केले. मात्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आपले सरकार हे गरीब, आदिवासी आणि दलितांचे सरकार असेल, असे सांगितले होते. मोदी जे बोलतात, ते करून दाखवतात. दरम्यान, मोदींनी साठ कोटींहून अधिक गरिबांचे जीवनमान उंचवावे यासाठी खूप मोठे काम केले. तसेच रामजन्मभूमीचा प्रश्न मोदी सरकारने न्यायालयात अचूक बाजू मांडल्याने सुटल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.