coronavirus : लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा होताच अमित शाहांनी केले ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:42 IST2020-04-14T14:36:09+5:302020-04-14T14:42:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

coronavirus : लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा होताच अमित शाहांनी केले ट्विट, म्हणाले...
नवी दिल्ली - देशात होत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन वाढवण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच देशात अन्नधान्य, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात असल्याचे शाह यांनी सांगितले.
अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी, भारत आणि भरातवासीयांचे संरक्षण व्हावे यासाठी देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.'
'लॉकडाऊनच्या काळात सर्व राज्य सरकारे केंद्र सरकारच्यासोबतीने काम करत आहेत. हा समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज आहे. जेणेकरून सर्व नागरिक लॉकडाऊनचे योग्य रीतीने पालन करतील, तसेच कुणालाही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवणार नाही.' असे अमित शाह म्हणाले.
'सद्यस्थितीत देशात अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे कुठल्याही नागरिकाने गोंधळून जाण्याची गरज नाही. त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी आपल्या आसपास राहनाऱ्या गरिबांची मदत करावी,' असे आवाहन अमित शाह यांनी केले.