Coronavirus: केंद्राकडून दुसरे आर्थिक पॅकेज?; लवकरच उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 12:44 AM2020-05-03T00:44:43+5:302020-05-03T06:45:58+5:30
1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज सरकारने गरीब महिला आणि वृद्धांसाठी जाहीर केले होते.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या उद्योगांसाठी दुसरे आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि प्रमुख मंत्री व अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी अमित शहा आणि सीतारामन यांच्याशी विचारविमर्श केला. या मुद्यावर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसारख्या प्रमुख आर्थिक मंत्रालयाच्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि ती सांभाळण्यासाठी मंत्रालयाकडून विचार करण्यात येत असलेल्या उपाययोजना याबाबत अर्थ मंत्रालय मोदी यांच्यासमोर एक योजना मांडणार आहे. मंत्रालयाने जीएसटीची मासिक आकडेवारी जारी करणेही टाळले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागरी उड्डयन, कामगार आदी मंत्रालयाच्या संबंधितांसोबत बैैठक घेतली. या बैठकीच्या एक दिवस अगोदर त्यांनी वाणिज्य आणि एमएसएमई मंत्रालयासोबत देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विचारविमर्श केला होता. या बैठकीला मोदी यांच्यासोबत गृहमंत्री आणि अर्थमंत्री दोघेही उपस्थित होते.
1.7 लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज सरकारने गरीब महिला आणि वृद्धांसाठी जाहीर केले होते. यामुळे लोकांची आर्थिक अडचण दूर होण्यास काही प्रमाणात मदत झाली होती. सूत्रांनी सांगितले की, सरकार लवकरच उद्योगांसाठी दुसरे प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करू शकते.