CoronaVirus News: रुग्णांना उत्तम उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा गट नेमा; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:58 AM2020-06-20T04:58:18+5:302020-06-20T04:58:37+5:30
चाचणीचे दर सर्वत्र समान ठेवणे आवश्यक
नवी दिल्ली : ‘कोविड-१९’च्या रुग्णांवर योग्य रितीने उपचार सुरू आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व राज्यांनी तज्ज्ञ व्यक्तींचा गट स्थापन करावा तसेच प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना चाचणीचे विविध राज्यांत वेगवेगळे दर आहेत. काही राज्यांत हे दर २५०० रुपये तर काही राज्यांत ४५०० रुपये आहेत. देशात चाचणीचा समान दर असणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. न्या. अशोक भूषण, न्या. एस. के. कौल, न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली.
दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात ‘कोविड-१९’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये हेळसांड झाली. रुग्णांचे मृतदेह उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या शेजारी ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना योग्य रितीने उपचार मिळत आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. याबद्दलही न्यायालयाने सरकारला कानपिचक्या दिल्या होत्या.
चाचणीचे दर कमी करण्यासंदर्भात चर्चा सुरू
कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त असलेल्यांना रुग्णालयात उत्तम उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरातने पावले उचलावीत, असा आदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना चाचणीचे दर कमी करण्यासाठी संबंधितांशी काही राज्ये चर्चा करत असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.