coronavirus: आरोग्य सेतू अॅपने केले ‘हॉटस्पॉट’चे अचूक भाकीत, ६५० ठिकाणांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:39 AM2020-05-11T01:39:41+5:302020-05-11T01:40:29+5:30
आरोग्य सेतूमध्ये असलेल्या माहितीचे सिंड्रोमिक मॅपिंगच्या साह्याने विश्लेषण करून कोरोना विषाणूची बाधा झालेला एखादा रुग्ण कोणकोणत्या भागांत गेला असावा, याचाही शोध घेता येतो.
नवी दिल्ली : देशभरातील ‘कोविड-१९’ साथीच्या ६५० हॉटस्पॉटबद्दल आरोग्य सेतू अॅपने अचूक भाकीत वर्तविले आहे. शिवाय, हॉटस्पॉट बनण्याची शक्यता असलेल्या आणखी ३०० ठिकाणांबद्दलही या अॅपने अंदाज वर्तविला आहे.
नीती आयोगाने ही माहिती जाहीर केली आहे. आरोग्य सेतू अॅपवर देशभरातील १० कोटी लोकांनी आपली नोंदणी केली आहे. या अॅपमध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण आणि इतर वैयक्तिक माहिती असते. ती मिळवणे कोणालाही शक्य असल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. हे अॅप केंद्र सरकारने विकसित केले आहे. आरोग्य सेतूमध्ये असलेल्या माहितीचे सिंड्रोमिक मॅपिंगच्या साह्याने विश्लेषण करून कोरोना विषाणूची बाधा झालेला एखादा रुग्ण कोणकोणत्या भागांत गेला असावा, याचाही शोध घेता येतो. त्यातूनच देशातील ६५० हॉटस्पॉटबद्दलचे अचूक भाकीत आरोग्य सेतू अॅपला वर्तविता आले. देशात १३ ते २० एप्रिल या कालावधित आरोग्य सेतूने १३० संभाव्य हॉटस्पॉटबद्दल केलेल्या भाकितानंतर, तेरा ते चौदा दिवसांतच आरोग्य खात्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट असल्याचे घोषित केले. एखादे ठिकाण हॉटस्पॉट होऊ नये, म्हणूनही आरोग्य सेतू उपयोगी आहे असे नीती आयोगाने म्हटले आहे.
वैयक्तिक वापरासाठी उपयुक्त
महाराष्ट्रामध्ये अठरा जिल्ह्यांत कोरोनाचे ६० हॉटस्पॉट आहेत. ‘आरोग्य सेतू’ हे अॅप प्रशासनापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या वापरासाठी अधिक उपयुक्त आहे. आपल्यापासून नेमक्या किती अंतरावर बाधित व्यक्ती आहे, याची माहिती या अॅपद्वारे मिळू शकते. कोरोना विषाणूबद्दल राज्य व देशात नेमकी काय स्थिती आहे, याची माहिती प्रशासनाकडे असतेच. लॉकडाऊन संपल्यानंतरच्या दिवसांत आरोग्य सेतू अॅप अधिक उपयुक्त ठरणार आहे.