coronavirus : या राज्यात लॉकडाऊन मोडणाऱ्या तब्बल 78 हजार जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 01:24 PM2020-04-05T13:24:57+5:302020-04-05T13:30:52+5:30
लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे सतत उल्लंघन होताना दिसत आहे
चेन्नई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा देशातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा निम्मा कालावधी पूर्ण होत आला तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोरोनाबधित रुग्णांचा आकडा आटोक्यात होता. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. तामिळनाडूत आतापर्यंत कोरोनाचे 485 रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तामिळनाडू सरकार आणि प्रशासनाकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 78 हजार 707 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 59 हजार 868 वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्याबरोबरच लॉकडाऊन तोडल्याप्रकरणी 71 हजार 204 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 च्या वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील कोरोना बाधितांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 42 टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी 100 पैकी 42 रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका 0 ते 20 वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. 41 ते 60 वयोगटातील रूग्ण 33 टक्के तर 60 पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण 17 टक्के आहेत.
मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले आहेत.