CoronaVirus : 'आयुष्मान भारत'चे ऑफिस सील; एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा, 25 जण क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 08:12 PM2020-04-20T20:12:02+5:302020-04-20T20:25:14+5:30
CoronaVirus : खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील जीवन भारती इमारतीत असलेले 'आयुष्मान भारत'चे कार्यालय सील करण्यात आले आहे.
कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. आयुष्यमान भारतचे कार्यालय पाच दिवस आधीच सील करण्यात आले असून आता येत्या 24 एप्रिलला उघडण्यात येईल. 'आयुष्मान भारत'चे सीईओ डॉ. इंदु भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. केंद्रीय मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
याशिवाय, देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले.