Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनावरील औषध आता ८५ रुपयांत खरेदी करा; भारतीय कंपनीची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 08:49 AM2021-05-25T08:49:45+5:302021-05-25T08:51:02+5:30
Antiviral drug Favipiravir:औषध उत्पादन कंपनी बाल फार्मानं सोमवारी कोविड १९ च्या उपचारासाठी बालफ्लू ब्रँडच्या नावानं फैविपिरावीर हे अँन्टिवायरल औषध लॉन्च केले आहे.
नवी दिल्ली – सध्या देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. या संकटात दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मिळणारं औषध फक्त ८५ रुपयात खरेदी करू शकता. लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणी लस उपलब्ध नाहीत. अशावेळी कोरोनावरील उपचारासाठी ८५ रुपयात आलेले औषध रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
औषध उत्पादन कंपनी बाल फार्मानं सोमवारी कोविड १९ च्या उपचारासाठी बालफ्लू ब्रँडच्या नावानं फैविपिरावीर हे अँन्टिवायरल औषध लॉन्च केले आहे. बंगळुरू येथील कंपनीने सांगितले की, हे औषध ४०० एमजी टॅबलेटच्या स्वरुपात मिळेल. त्याची किंमत ८५ रुपये प्रतिटॅबलेट इतकी असणार आहे. फैविपिरावीर या औषधाचा वापर कोविड १९ च्या सौम्य आणि मध्यम संक्रमण असलेल्या रुग्णांवर करता येईल. बालफ्लूचा वापर ५३ प्रकारच्या विषाणूंच्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. भारतीय औषध महानियंत्रण(DCGI)नं कोविड १९ उपचारासाठी बालफ्लूच्या औषधाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या घटत असल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. तरीही २३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही २० टक्क्यांहून जास्त असल्याने चिंता कायम आहे. मात्र, महाराष्ट्राने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत असून एकाही जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर नसल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३८२ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आहे. गोवा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, नागालँड, पुदुच्चेरीसह एकूण १३ राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांहून अधिक आहे.
रोश इंडिया-सिप्ला यांचे अँटिबॉडी कॉकटेल भारतात उपलब्ध
रोश इंडिया आणि सिप्ला यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेले अँटिबॉडी कॉकटेल बाजारात दाखल झाले आहे. कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब यांच्यापासून हे अँटिबॉडी कॉकटेल बनले आहे. सिप्लाच्या वितरण प्रणालीच्या माध्यमातून हे कॉकटेल उपलब्ध होऊ शकते. देशात आपत्कालीन वापरासाठी या कॉकटेलला अलीकडेच मंजुरी मिळाली आहे.