Coronavirus: ‘कोविड-१९’चा प्रतिबंध करण्यासाठी रुग्ण, डॉक्टरांना बीसीजी लस उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:10 PM2020-05-05T23:10:07+5:302020-05-05T23:10:42+5:30
‘इंडियन जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स’मधील शोधनिबंधाचा निष्कर्ष
नवी दिल्ली : क्षयरोगावरील बीसीजी लस ही ‘कोविड-१९’चे रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी; तसेच ज्येष्ठ नागरिकांंना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टोचल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष ‘इंडियन जर्नल ऑफ ऑर्थोपेडिक्स’मधील एका शोधनिबंधात काढण्यात आला आहे.
दिल्ली येथील मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अजय गुप्ता यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे. ‘क्षयरोगच नव्हे, तर अन्य आजारांविरोधातही लढण्यासाठी बीसीजी लस शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक भारतीयाला लहानपणीच बीसीजीची लस टोचलेली असते. मात्र, ही लस टोचणे जिथे बंद झाले आहे, अशा देशांत क्लोरोक्वीनबरोबर बीसीजीची लस दिली जाऊ शकते. बीसीजी लशीचे माणसांवर याआधीच यशस्वी प्रयोग झाले असून, ती जगात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे,’ असे या शोधनिबंधात नमूद करण्यात आले आहे.
बीसीजी लस उपयुक्त का?
या शोधनिबंधातून काढण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, शरीरातील रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘सीडी ८ टी’ पेशींचे बीसीजी लसीतील ग्रॅन्यूलोमस या पेशीसमूहाशी बंध जुळतात. त्यामुळे या पेशी अधिक जोमाने विषाणूंचा प्रतिकार करू लागतात.
सहा ते दहा आठवड्यांत चांगला परिणाम
शरीरातील रोगप्रतिकारशक्तीशी निगडित पेशी अतिसक्रिय होण्याचा धोका बीसीजीची लस टोचल्यामुळे टाळता येण्याची शक्यता आहे. बीसीजी लस टोचल्यानंतर, त्याचे रोगप्रतिकारशक्तीवर सहा ते दहा आठवड्यांत चांगले परिणाम दिसून येतात. त्यामधील काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून आणखी काही औषधेही देता येतील, असे या शोधनिबंधाचे लेखक आॅर्थोपेडिकसर्जन डॉ. अजय गुप्ता यांनी म्हटले आहे.