CoronaVirus कोरोनाविरोधातील लढाईत बीसीजी लस बनणार भारतीयांची 'ढाल'; १९४९ पासून लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 07:25 PM2020-03-31T19:25:52+5:302020-03-31T20:03:23+5:30
बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी संशोधकांना एक नवीन आशेचा किरण दिसला आहे. भारतात गेल्या ७२ वर्षांपासून बीसीजीची लस लहान मुलांना टोचली जाते. आता जग या लसीला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ढाल मानू लागले आहे.
न्यूयॉर्क इंन्सि्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनच्या बायोमेडिकल सायन्स विभागाने केलेल्या एका अभ्यासामघ्ये अमेरिका आणि इटली सारख्या देशांमध्ये बीसीजी लसीकरण योजना नाहीय. यामुळे या देशांमधये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूही होत आहेत. तर जपान आणि ब्राझिल देशांमध्ये या दोन्ही देशांच्या तुलनेत कोरोनाचे बळी कमी आहेत.
बीसीजी म्हणजे बेसिलस कामेट गुएरिन असे पूर्ण नाव आहे. ही लस श्वासोच्छवासाशी संबंधित आजारांवरील आहे. बीसीजी ही लस जन्मल्यानंतर सहा महिन्यांच्या काळामध्ये दिली जाते. जगात या लसीचा पहिल्यांदा वापर १९२० मध्ये झाला होता. ब्राझीलसारख्या देशामध्ये या लसीचा वापर होत आहे.
दिलासादेणारी बाब म्हणजे भारतातही ही लस नवजात बालकांना दिली जाते. या अभ्यासामध्ये असे आढळून आले की ही लस न देणाऱ्या देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये अमेरिका, लेबनॉन, नेदरलँड आणि बेल्जिअम हे देश आहेत. तर जपान, ब्राझील, चीन, भारत या देशांमध्ये ही लस दिली जाते. चीनमध्येच कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने चीनला अपवाद ठेवण्यात आले आहे.
या अभ्यासामध्ये ज्या देशांमध्ये बीसीजी लस देण्यात येते त्या ठिकाणी कोरोनाचे बळी कमी आहेत. ज्या देशांमध्ये आधीपासून बीसीजी लस देण्यात येत आहे तिथे कोरोनाचा धोका दहा पटींनी कमी झालेला आहे. तर ईराणमध्ये १९८४ मध्ये ही लस देण्यास सुरुवात झाली यामुळे तिथे ३६ वर्षांखालील नागरिकांना ही लस दिलेली आहे. मात्र, वृद्धांना लस दिलेली नसल्याने त्या देशात कोरोनाचा धोका जास्त आहे.
या अहवालामध्ये भारताचे नाव नसले तरीही हे निष्कर्ष भारतासाठी आनंदाचे आहेत. कारण बीसीजी लस भारतात १९४८ मध्ये देण्यास सुरुवात करण्यात आली होती. हा प्रायोगिक प्रयोग होता. मात्र, नंतर १९४९ पासून देशभरात शाळांमध्ये लसीकरण सुरु करण्यात आले. १९५१ पासून मोठ्या प्रमाणावर लसीकरण वाढविण्यात आले. तर राष्ट्रीय टीबी योजना सुरू झाली तेव्हा १९६२ पासून जन्मताच बीसीजी लस देण्यात येऊ लागली. हा विचार केल्यास भारतात मोठ्या लोकसंख्येला बीसीजी लस देण्यात आली आहे. सध्या जन्माला येणाऱ्या ९७ टक्के बालकांना ही लस दिली जाते.