Coronavirus: देशात मृतांची संख्या वाढणार नाही; डॉक्टरांच्या 'या' दाव्याने भारतीयांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 09:50 AM2020-03-26T09:50:16+5:302020-03-26T10:03:39+5:30
भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६०० वर गेली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर वाढता धोका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६०० वर गेली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र भारतातील एका डॉक्टरांनी असा दावा केला आहे की त्या दाव्यावे भारतीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.
आयसीएमआरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्युनोलॉजीचे माजी डीन डॉ. नरिंदर मेहरा यांनी सांगितले की,रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणे भारतात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या वाढणार नाही. परंतु सिद्ध करण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं असल्याचे नरिंदर मेहरा यांनी सांगितले
देशात कमी मृत्यूची तीन कारणे असून यामध्ये शारीरिक अंतर, रोगप्रतिकार प्रणाली आणि पर्यावरण यांचा समावेश आहे. भारतात हळद, आले, मसालेदार अन्न मोठ्या प्रमाणात खातात आणि असेच अन्न आपली प्रतिकारशक्ती वाढवते असं मत नरिंदर मेहरा यांनी व्यक्त केलं आहे. यामुळेच इटली, स्पेन, अमेरिका यासारख्या भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही असं नरिंदर मेहरा यांनी सांगितले.
जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या १९,२४६ इतकी झाली आहे. जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. आशियात ९९,८०५ रुग्ण आहेत तर ३,५९३ बळी गेले आहेत. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.