CoronaVirus News: कोरोना विरुद्धच्या संघर्षात पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा; पोलिसांची नागरिकांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:24 PM2020-07-15T15:24:38+5:302020-07-15T15:42:01+5:30
CoronaVirus News: कोरोनााविरुद्धच्या लढ्यात पोलीस घेणार सर्वसामान्यांची मदत
बंगळुरू: देशातील कोरोनाचा विळखा वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बंगळुरू पोलिसांनी कोरोना विरुद्धच्या संघर्षात साथ देण्यासाठी सर्वसामान्यांना साद घातली आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा, असं आवाहन शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी केलं आहे.
बंगळुरूतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनावरही ताण आला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांची मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी १८ ते ४५ वर्षांच्या व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून काम करता येईल. त्यांना 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' म्हणून सेवा देता येईल, अशी माहिती राव यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींनी http://bcp.gov.in वर जाऊन नोंदणी करावी, असं आवाहन आयुक्तांनी केलं.
Inviting physically fit n service minded residents of Bengaluru, both men and women, between the age of 18 to 45 to Volunteer as Civil Police Warden to help the local police in regulation and enforcement of anti-Covid measures. To register log on to https://t.co/sPMdHigqYn
— Bhaskar Rao IPS (@deepolice12) July 14, 2020
लॉकडाऊनला सुरुवात होताच बंगळुरूतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. मात्र आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. कर्नाटक सरकारनं शनिवारी शहर आणि ग्रामीण भागात पूर्णपणे लॉकडाऊन घोषित केला. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली आहे. काल रात्री ८ वाजल्यापासून सुरू झालेला लॉकडाऊन २२ जुलै पहाटे ५ पर्यंत कायम असेल. या कालावधीत केवळ रुग्णालयं, अन्नधान्य, दूध, भाज्या, औषधांची दुकानं सुरू राहतील.
कर्नाटकात कोरोनाचे ४४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील २५ हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर १७ हजार ३९१ जणांवर सध्याच्या घडीला उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत ८४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानी बंगळुरूत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले असून त्यांचा आकडा साडे पंधरा हजारांहून अधिक आहे.