coronavirus: कोरोना चाचण्यांत बिहार सर्वात पिछाडीवर; १० लाखांमागे २८१ चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:16 AM2020-05-11T05:16:11+5:302020-05-11T05:16:50+5:30
उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशात गतीने चाचण्या व्हाव्यात, केंद्र सरकारने केली सूचना
नवी दिल्ली : कोरोनाच्या चाचण्या करण्यात बिहार सर्वात पिछाडीवर असून दहा लाख लोकांमागे येथे केवळ २८१ चाचण्या होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. बिहारमध्ये १० मेपर्यंत कोरोनाच्या ३४,१५० चाचण्या झाल्या आहेत. या प्रकरणी केंद्र सरकारने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर आता लक्षणे नसलेल्या लोकांचीही चाचणी होऊ शकेल. अर्थात, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे म्हणणे आहे की, राज्यात केवळ ६२९ कोरोना रुग्ण आहेत. हा डेटा आयसीएमआर आणि सरकारी एजन्सींकडून जारी करण्यात आला होता.
केंद्रीय गृहमंत्रालयासोबतच्या संघर्षामुळे पश्चिम बंगाल सध्या चर्चेत आहे. मात्र, चाचण्यांच्या बाबतीत त्यांची कामगिरी बिहारपेक्षा चांगली आहे. दर दहा लाखांमागे त्यांचे चाचण्यांचे प्रमाण ४०३ एवढे आहे. केंद्रातील आरोग्य विभागाला असे वाटते की, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गतीने चाचण्या व्हायला हव्यात. कारण, राज्यात जे लाखो कामगार येत आहेत त्यामुळे हे संकट आणखी गडद होणार आहे. मीडिया महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आंध्रप्रदेशवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. या राज्यात रुग्णांची अधिक संख्या आहे. कारण, ही राज्ये मोठ्या संख्येने चाचण्या करत आहेत. पीएमकडून नियुक्त टास्क फोर्सशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांनी चाचण्या वाढविल्या नाहीत तर, कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाईल.
कामगारांच्या प्रवेशाला आधी विरोध
च्बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुरुवातीला कामगारांच्या राज्यातील प्रवेशाला विरोध केला आणि नंतर त्यांना प्रवेशाची परवानगी दिली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही रेल्वेंना राज्यात येऊ देण्यास परवानगी दिली.
च्या राज्यांनी आपल्या लोकांना स्वीकारावे यासाठी त्यांना तयार करण्यात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना खूप वेळ लागला. कारण, या स्थलांतरीत लोकांनी क्वारंटाइनचा वेळ पूर्ण केलेला आहे. त्यामुळेच लक्षणे नसलेल्या लोकांची तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.