Coronavirus: जे. पी नड्डा यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतला ‘हा’ निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:34 PM2020-03-18T13:34:25+5:302020-03-18T13:36:06+5:30
BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती
नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका सर्व देशांना बसला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे १४७ रुग्ण आढळून आले आहेत यातील सर्वाधिक ४२ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे भारतात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत कोरोनामुळे आपण कोणतेही आंदोलन, धरणे, निदर्शने टाळावीत अशी सूचना केली होती. यानंतर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पुढच्या 1 महिन्यासाठी पक्ष कोणत्याही आंदोलने, निदर्शनेत भाग घेणार नाही असं सांगितले आहे. याबाबतच्या सूचना सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जर एखाद्या विषयावर भूमिका मांडायची असेल तर पक्षाचे ४ ते ५ पदाधिकारी संबंधित अधिकारी किंवा राजकीय नेते यांना निवेदन देतील, पण कोणत्याही परिस्थितीत लोक एकत्र जमणार नाहीत. याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
संसदीय पार्टी की बैठक में प्रधानमंत्री जी ने इच्छा जाहिर की थी कि कोरोना के कारण भाजपा किसी जनांदोलन या प्रदर्शन में अगले 1 महीने तक भाग न ले।
— BJP (@BJP4India) March 18, 2020
इसको ध्यान में रखते हुए आज ये निर्णय लिया गया है कि अगले 1 माह तक पार्टी किसी आंदोलन या प्रदर्शन में शामिल नहीं होगी: श्री @JPNaddapic.twitter.com/C0qiJutmci
समाजात जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना काय करावे व काय करू नये हे सांगण्यासाठी भाजपाने राज्य कार्यकारणीकडे कोरोना विषाणूबद्दल परिपत्रक जारी केले आहे. पंतप्रधानांनी सार्क नेत्यांशी चर्चा केली तेव्हा आपण जागरूक राहिले पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे पण घाबरू नका असे त्यांनी नमूद केले होते तसेच आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले आहे. तथापि, घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येक स्तरावर पावले उचलली गेली आहेत आणि त्या पुढेही सुरू ठेवल्या जातील. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले होते. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्नच मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला होता.