Coronavirus: राज्य सरकारनं सत्य सांगावं, सर्वसामान्यांना त्रास होतोय; भाजपा खासदाराचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:11 PM2020-06-13T17:11:55+5:302020-06-13T17:12:49+5:30
कोणत्याही नेत्याला, सेलिब्रिटीला त्रास होणार नाही, त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होतील, पण सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बेड्स उपलब्ध होत नाहीत.
नवी दिल्ली – देशात दिवसेंदिवस कोरोनाची संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. माजी क्रिकेटर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी एका कार्यक्रमातून राज्य सरकारवर आरोप केला. दिल्लीची परिस्थिती चिंताजनक आहे. केजरीवाल सरकारनं अनलॉक करायला नको होता. दारुची दुकानं उघडल्यापासून स्थिती बिघडत चालली आहे असं गौतम गंभीर यांनी सांगितले.
भाजपा खासदार गौतम गंभीर म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सांगतात आम्ही एक कोटी लोकांना अन्न देत आहोत, दुसऱ्या दिवशी २५ लाख सोडून गेले, सरकारने दावा केलाय आम्ही लोकांना खाण्याची सुविधा केली आहे. पण आतापर्यंत किचनची माहिती दिली नाही. स्थिती भयंकर झाली आहे. सामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कोणत्याही नेत्याला, सेलिब्रिटीला त्रास होणार नाही, त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होतील, पण सामान्य माणसांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. लोकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. केजरीवाल सरकारने सांगितले आम्ही ३० हजार बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत पण ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. हे बेड्स उपलब्ध केले आहेत त्याची माहिती द्यायला हवी. खाण्याची सोय केली आहे तर एका तरी किचनचा पत्ता द्यावा असं आव्हान गौतम गंभीर यांनी केले आहे.
त्याचसोबत राज्य सरकारने उपलब्ध करुन दिलेले ३० हजार बेड्स कुठे आहेत? वास्तवात ते बेड्स लोकांना मिळत नाहीत. लोकांना हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत. तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून डिझेलचे दर वाढवून महागाई वाढवली. दिल्लीतील जनतेला खरं सांगा, एकत्र येत आम्ही काम करायला तयार आहोत, दिल्लीच्या जनतेला त्रास होऊ नये असचं आम्हाला वाटतं असंही गौतम गंभीर म्हणाले. यापूर्वीही खासदार फंडातून १ कोटींची मदत केली. दिल्ली हॉस्पिटल्सची परिस्थितीची मला कल्पना होती. त्यामुळे मी त्यांना PPE किट दिले. पण, दिल्ली सरकारलाच आमच्यासोबत काम करायची इच्छा नाही असा आरोप त्यांनी केला.