कोरोनाविरोधातील लढाईदरम्यानच भाजपाकडून बिहार निवडणुकीची तयारी, ९ जूनला अमित शाह घेणार व्हर्चुअल रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:49 PM2020-06-01T19:49:03+5:302020-06-01T19:54:38+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी होणारी बिहार विधानसभेची निवडणूकही काही काळासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण असे असले तरी भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पाटणा - भारतात कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. बिहारमध्येही कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी होणारी बिहार विधानसभेची निवडणूकही काही काळासाठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर बिहारमध्ये निवडणूक व्हावी, असा काही जणांचा मतप्रवाह आहे. पण असे असले तरी भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी सांगितले की, ९ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार आहेत. या व्हिडिओ कॉन्फ्रसिंगमुळे बिहारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होईल आणि बिहारमधील निवडणुकीच्या मोहिमेच्या कार्यक्रमाची सुरवातही होईल.
या व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून अमित शाह एक लाख लोकांपर्यंत पोहोचतील. ते या सभेमधून पक्षाची तयारी आणि इतर कामांची माहिती देतील. त्यानंतर भाजपाचे राष्ट्र्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेसुद्धा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून ते निवडणूक प्रचाराची तयारी सुरू करतील.
सध्याच्या परिस्थितीमुळे भाजपा आता डिजिटल निवडणूक प्रचार अभियानाच्या तयारीत गुंतला आहे. गेल्या काही दिवसांत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी डिजिटल निवडणूक घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या तयारीला जोर चढला होता.