coronavirus : लॉकडाऊनदरम्यान भाजपाने उचलले मोठे पाऊल, रोज पाच कोटी गरिबांना देणार भोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 08:47 AM2020-03-26T08:47:35+5:302020-03-26T08:48:05+5:30
लॉकडाऊनमुळे गरिबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आपली रोजीरोटी गमवावी लागली आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबधितांचा सातत्याने वाढत असलेला आकडा आणि जगातील इतर देशात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे गरिबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आपली रोजीरोटी गमवावी लागली आहे. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने गरीबांच्या मदतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे.
भाजपाने गुरुवारपासून दररोज 5 कोटी गरीबांना भोजन देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपाकडून एक कोटी कार्यकर्त्यांची ओळख करण्यात येणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय जेपी नड्डा यांनी यसंदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली. तसेच पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येकी पाच जणांची जबाबदारी घेईल, असे नड्डा यांनी सांगितले. जेपी नड्डा यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाच्या देशभरातील एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी नड्डा यांनी हे आवाहन केले.
देशभरात एकूण कोरोनाबधितांची संख्या 600 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांची संख्या 600 पर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कालपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 20 हजारांवर पोहोचली आहे.