CoronaVirus News: वंदे भारत मोहिमेतील विमान तिकिटांचा काळाबाजार सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:48 AM2020-08-15T04:48:16+5:302020-08-15T04:48:32+5:30
भारतीय प्रवाशांची लुबाडणूक; एअर इंडियाकडून कडक कारवाई अपेक्षित
नवी दिल्ली : कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे विदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत सुरू केलेल्या विमानसेवेच्या तिकिटांची काही ट्रॅव्हल एजंटकडून काळ्या बाजारात विक्री होत आहे. लॉकडाऊनदरम्यान विशेष राजधानी एक्स्प्रेस सुरू केली तेव्हाही त्यांच्या तिकिटांचा असाच काळाबाजार झाला होता.
भारतीय प्रवाशांची लुबाडणूक एअर इंडियाच्या निदर्शनास काही जणांनी आणून दिल्यानंतरही या ट्रॅव्हल एजंटवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कोरोना साथीमुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असली तरी वंदे भारत मोहीम ७ मेपासून सुरू आहे. एअर इंडियाची विमाने यासाठी प्रामुख्याने वापरण्यात आली. त्याद्वारे विदेशातून १३ लाख भारतीय मायदेशात परतले आहेत. मात्र, या विमानांचे तिकीट मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा प्रवासी आॅनलाइन बुकिंग करायला गेला तर सर्व तिकिटे विकली गेली आहेत अशी सूचना तिथे वाचायला मिळते. मात्र, दिल्लीतील काही ट्रॅव्हल एजंट अतिशय चलाखीने ही तिकिटे काळ्या बाजारात विकत आहेत.
‘ट्रॅव्हल एजंटचे परवाने कायमचे रद्द करा’
वंदे भारत सेवेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विमानांमधील तिकिटांचा काळाबाजार निदर्शनास येताच एअर इंडियाने एका पत्रकात जुलैमध्ये म्हटले होते की, गैरकृत्ये करणाºया ट्रॅव्हल एजंटवर कडक कारवाई केली जाईल. लुबाडणूक करणाºया ट्रॅव्हल एजंटचे परवाने कायमचे रद्द करावेत, अशी मागणी विदेशात अडकलेल्या भारतीयांनी केली आहे.
पत्रकाराने केला पर्दाफाश
३१ जुलै रोजी एअर इंडियाचे दिल्ली ते टोरँटो यादरम्यानच्या प्रवासी तिकिटाची मूळ किंमत ७५ हजार रुपये होती. एका पत्रकाराने आपण कॅ नडातील प्रवासी असल्याचे भासवून ट्रॅव्हल एजंटला संपर्क साधला असता, त्याने हे तिकीट १.७५ लाख रुपयांना मिळवून देतो असे सांगितले. ८ किंवा ९, ११ आॅगस्ट या तीन दिवसांतील तिकिटाची किंमत १.७५ लाख आहे. यातील एकही तिकीट शिल्लक नसून ती दोन किंवा सव्वादोन लाख रुपयांना विकली गेल्याचे ट्रॅव्हल एजंटने स्टिंग आॅपरेशन करणाºया पत्रकाराला सांगितले. तिकीट आरक्षणाचे काम करणाऱ्यांकडून तिकीट मिळविण्यासाठी मला खटपट करावी लागेल, असेही तो म्हणाला.