Coronavirus: एकत्र जन्मले अन् एकत्रच गेले; कोरोनामुळे जुळ्या भावांच्या मृत्यूनं कुटुंबही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 11:20 AM2021-05-18T11:20:24+5:302021-05-18T11:21:11+5:30
मेरठ येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घराचा परिसर कंन्टेंन्मेंट झोन घोषित केला होता
मेरठ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. शहरात राहणाऱ्या ग्रेगरी रेमंड राफेल यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना कोरोनामुळे एकाच वेळी गमावलं आहे.(Twins Die Due to Corona) कुटुंबातील २ मुलांच्या अचानक जाण्याने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैव म्हणजे या दोघांचा जन्म एकत्र झाला होता आणि मृत्यूही एकाच दिवशी झाला. अलीकडेच दोघांनी २४ वा बर्थ डे साजरा केला होता.
या दोघांचे नाव जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी असं आहे. हे दोघंही एकत्र कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते. हैदराबादमधील एकाच कंपनीत दोघं नोकरीला होते. वडील रेमंड यांनी सांगितले की, माझ्या मुलांना २४ एप्रिलला खूप ताप आला. कोरोना संक्रमित झाल्यामुळे दोघांचा मागच्या आठवड्यात १३ आणि १४ मे रोजी मृत्यू झाला. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी आणि राल्फ्रेड जॉर्ज ग्रेगरी यांचा जन्म २३ एप्रिल १९९७ मध्ये झाला होता.
मेरठ येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घराचा परिसर कंन्टेंन्मेंट झोन घोषित केला होता. त्यावेळी रेमंड त्यांच्या दोन्ही मुलांवर घरीच उपचार करत होते. त्यांना वाटलं की, दोघांचा ताप बरा होईल. परंतु तसं झालं नाही. पण जेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली जायला लागली तेव्हा डॉक्टरांनी दोघांना हॉस्पिटलला नेण्याचा सल्ला दिला. १ मे रोजी या दोघांनाही खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु काही दिवसांच्या उपचारानंतर दुसरा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला.
डॉक्टरांनी या दोघांना कोरोना वार्डातून सामान्य ICU रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. १३ एप्रिल जोफ्रेडचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसरा मुलानेही अखेरचा श्वास घेतला. दोन तरुण मुलांना गमावल्यानं ग्रेगरी रेमंड यांना दु:ख अनावर झालं. शिक्षक असल्याने मी माझ्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप संघर्ष केला होता. मृत्यूपूर्वी हे दोघंही कोरिया जाण्याची प्लॅनिंग करत होते. त्याचसोबत कामासाठी जर्मनीलाही जायचं होतं. पण माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करून देव मला एवढी मोठी शिक्षा देईल वाटलं नाही अशी हतबल प्रतिक्रिया या मुलांच्या वडिलांनी दिली.