Coronavirus: ३२ जवान बाधित झाल्यानंतर बीएसएफचे मुख्यालयही सील; दोन माळ्यांचे केले निर्जंतुकीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:52 PM2020-05-04T22:52:33+5:302020-05-04T22:52:48+5:30
जामा मशीद व चांदनी महल येथे बीएसएफचे एकूण ९४ जवान तैनात होते. त्यापैकी ३२ जणांना कोरोना झाला असून, हे सारे बीएसएफच्या १२६ व्या बटालीयनचे जवान आहेत
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पाठोपाठ आता सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्यालयही सील होण्याच्या मार्गावर आहे. तेथे तैनात एका हेड कॉन्स्टेबलचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, लोधी मार्गावरील सीजीओ कॉम्प्लेक्समधील मुख्यालयाचे २ माळे सोमवारी तातडीने सील करून, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बीएसएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी सायंकाळी उघडकीस आले. आता दिल्लीतील कोरोनाबाधित बीएसएफ जवानांची संख्या ३२ झाली आहे. सर्व जवान जामा मशीद आणि चांदनी महल येथे दिल्ली पोलिसांसोबत लॉकडाऊनच्या ड्यूटीवर तैनात होते. या साऱ्यांवर आता विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू झाले असून, यांच्या संपर्कातील जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जामा मशीद व चांदनी महल येथे बीएसएफचे एकूण ९४ जवान तैनात होते. त्यापैकी ३२ जणांना कोरोना झाला असून, हे सारे बीएसएफच्या १२६ व्या बटालीयनचे जवान आहेत, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रविवारी जवळपास ८० जवानांचे अहवाल बीएसएफला प्राप्त झाले, त्यातील २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आणखी काही जणांचे चाचणी अहवाल यायचे आहेत. दिल्ली आरोग्य विभाग व पोलिसांच्या सहकार्याने या जवानांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्याचवेळी या जवानांना कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा स्रोत हाती लागू शकला नाही.
इतर रोगांवरील उपचारादरम्यान संसर्ग?
बीएसएफच्या आर. के. पूरम येथील हॉस्पिटलमध्ये ५ आरोग्यसेवकांना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले होते. तर, कर्करोगाचे दोन व मूत्रपिंडांचा आजार असलेला एक रुग्णही येथे आहे. त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये उपचारादरम्यान संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, सीआरपीएफ आणि बीएसएफ या सुरक्षा यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाच्या घटकाला कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होणे चिंतेचा विषय ठरत आहे.