केजरीवाल म्हणाले, "दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 01:32 PM2021-04-18T13:32:39+5:302021-04-18T13:37:36+5:30
Coronavirus Updates : दिल्लीत गेल्या २४ तासांत आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ, DDMA चे कुंभ मेळ्यातून परतलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्याचे निर्देश
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात अडीच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे दिल्लीतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद झाली. शनिवारी दिल्लीत २४,३७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. याचाच अर्थ प्रत्येक तासाला १ हजार कोरोनाबाधितांची नोंद झाली. दिल्लीत एका दिवसात इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देल्या चोवीस तासांत दिल्लीत १६७ जणांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली. हीदेखील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "गेल्या चोवीस तासांत चोवीस हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. तर त्याच्या पूर्वी चोवीस तासांत १९ हजार रुग्णांची नोंद झाली होती. यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव किती तेजीनं वाढत आहे याचा अंदाज येत आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट वाढून ३० टक्के झालाल आहे. तर चोवीस तासांपूर्वी तो २४ टक्के इतका होता. दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी जे बेड्स आरक्षित होते ते तेजीनं भरत चालले आहे. आयसीयू बेड्सचीदेखील कमतरता आहे. संपूर्ण दिल्लीत मिळून आता १०० पेक्षा कमी आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत," असं केजरीवाल म्हणाले.
ऑक्सिजनची कमतरता
"सध्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून जी मदत मिळत आहे त्यासाठी आम्ही आभारी आहोत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी शनिवारी चर्चा केली. त्यावेळी आम्हाला बेड्सची आवश्यकता असल्याची त्यांना माहिती गिली. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही याची कल्पना देण्यात आली आहे," असं त्यांनी नमूद केलं.
कुंभ मेळ्यातून येणाऱ्या क्वारंटाईन होणं आवश्यक
केजरीवाल सरकारनं कुंभ मेळ्यातून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक केलं आहे. दिल्ली डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीनं एक आदेश जारी केला आहे. तसंच तुम्ही ४ एप्रिल पासून आतापर्यंत कुंभ मेळ्यात असाल किंवा १८ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी जाणार असा तर तुमची संपूर्ण माहिती हा आदेश जारी होण्याच्या २४ तासांच्या आत www.delhi.gov.in या वेबसाईटवर अपलोड करावी लागणार असल्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त कुंभ मेळ्यातून जे कोणी येणार आहेत, त्यांना दिल्लीत परतल्यावर १४ दिवस होम क्वारंटाईन होणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.