CoronaVirus: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; नव्या रुग्णांपैकी ६५% तबलिगी जमातशी संबंधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:05 PM2020-04-03T20:05:30+5:302020-04-03T20:06:15+5:30
coronavirus नव्या ४८५ रुग्णांपैकी २९५ जण तबगिली जमातशी संबंधित
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे. यातील निम्म्याहून अधिक जण निझामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झाले होते. आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारी दिली. गेल्या दोन दिवसांत तबलिगी जमातशी संबंधित ६४७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. हे रुग्ण १४ राज्यांमधील आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातील ५० टक्क्यांहून अधिक जण मरकजशी संबंधित आहेत.
गुरुवारी रात्री पावणे बारापर्यंत देशात कोरोनाचे ४८५ नवे रुग्ण आढळून आले. यातील २९५ जणांनी मरकजमध्ये हजेरी लावली होती. त्यामुळे नव्या रुग्णांपैकी जवळपास ६५ टक्के रुग्ण मरकजशी संबंधित आहेत. गुरुवारपर्यंत एकट्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या २९३ इतकी होती. त्यातील १८२ जण मरकजशी संबंधित आहेत. मरकजला उपस्थित राहिलेल्या तिघांचा गेल्या २४ तासांत दिल्लीत मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ५६ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. यातील कमीत कमी २० जण तबलिगी जमातशी संबंधित आहेत.
शुक्रवारी तमिळनाडूत कोरोनाचे १०२ नवे रुग्ण आढळले. यातील १०० जण निझामुद्दीनमधील मरकजला उपस्थित होते. त्यामुळे तमिळनाडूतील कोरोनाबाधितांचा आकडा ४११ वर पोहोचला आहे. यातील ३६४ जण तबलिगी जमातशी संबंधित आहेत. मरकजला हजेरी लावणाऱ्या राज्यातल्या १२०० जणांना शोधण्यात यश आलं असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती तमिळनाडूच्या आरोग्य सचिव बीला राजेश यांनी दिली आहे.