CoronaVirus: जगात कोरोनाग्रस्तांची संख्या लाखावर; कैद्यांनाही सोडावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 10:45 PM2020-03-06T22:45:47+5:302020-03-06T22:46:49+5:30
कोरोनाला थोपविण्यासाठी चीनमध्ये हस्तांदोलन करण्यावरही बंदी आणली होती. याचाच कित्ता गिरवत ईराणमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात जवळपास 80 हून अधिक देशांमध्ये थैमान घातले आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या लाखावर गेली असून भारतातही 31 जणांना याची लागण झाली आहे. ईराणमध्ये व्हायसरच्या थैमानामुळे तब्बल 54 हजार कैद्यांना सोडून द्यावे लागले आहे. चीनमध्ये उत्पन्न झालेल्या या व्हायरसने मोठे संकट उभे केले आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी चीनमध्ये हस्तांदोलन करण्यावरही बंदी आणली होती. याचाच कित्ता गिरवत ईराणमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. तर मशीदींमध्ये नमाज अदा करण्यासही बंदी आणली आहे. तसेच कोणाशी हातही मिळविण्यावर सरकारने बंदीचे आदेश दिले आहेत. याच्या ऐवजी भारतीयांसारखे हात जोडा किंवा हाताने हाय असे करा, असे म्हटले आहे.
जगभरात कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या काल 98123 एवढी होती. जगभरातील 87 देशांमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरस पसरला आहे. मृतांचा आकडा 3385 वर गेला आहे. एकट्या चीनमध्येच 80552 रुग्ण सापडले आहेत. तर चीनच्या बाहेर 17571 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 343 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरिया 6284-मृत्यू 42 झाले आहेत. यानंतर इटलीमध्ये 3858 आणि 148 मृत्यू, इराणमध्ये 3513 रुग्ण 107 मृत्यू झाले आहेत.
इराणने शुक्रवारी सांगितले की देशात कोरोना विषाणूमुळे 124 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,747 लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी केली आहे. शहरांमधील लोकांना स्थानबद्ध करण्यासाठी ते शक्तीचा वापर करू शकतात, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.