coronavirus : ...असा साजरा करा रमजान, मोदींनी मुस्लिम बांधवाना केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 01:27 PM2020-04-26T13:27:16+5:302020-04-26T13:32:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे.
नवी दिल्ली - देशासमोरील कोरोनाविषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गडद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी मोदींनी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना आवाहन केले आहे. यावर्षी रमजान महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनवा, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. गेल्यावेळी रमजान महिना साजरा केला तेव्हा यावर्षीच्या रमजानवेळी एवढ्या संकटांचा सामना करावा लागेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्यामुळे यावर्षी रमजान महिन्याला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभाव यांचे प्रतीक बनवा. तसेच ईद येण्यापूर्वी हे जग कोरोनामुक्त व्हावे आणि पूर्वीप्रमाणे आनंद आणि उत्साहाने ईद साजरे करता यावे यासाठी पूर्वीपेक्षा जास्त इबादत करा,' असे आवाहन मोदींनी केले.
'तसेच रमजानच्या दिवसांत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून लोक कोरोनाविरोधातील लढाईला अजून मजबूत करतील. रस्ते, बाजार आणि मोहल्ल्यांमध्ये फिजिकल डिस्टंसिंगचे पालन होईल,' अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. कोरोनविरोधात सुरू असलेल्या लढ्यादरम्यान बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना आपल्या घरात, गल्लीत, ऑफिसात आलेला नाही म्हणजे, तो येणारच नाही असे नाही. 'सावधानी हटी, दुर्घटना घटी', असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घ्या, असे आवाहन मोदींनी केले.