coronavirus: केंद्राने राज्यांना दिले ६१९५ कोटी रुपये, महाराष्ट्र मात्र अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:03 AM2020-05-13T04:03:51+5:302020-05-13T04:04:39+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी १४ राज्यांना ६१९५.०८ कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले. यामुळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक निधी राज्यांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : राज्यांना सहन करावी लागत असलेली महसुलाची घट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने १४ राज्यांना ६१९५ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. मात्र यामध्ये महाराष्टÑाला एक रुपयाही मिळालेला नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी १४ राज्यांना ६१९५.०८ कोटी रुपये दिल्याचे जाहीर केले. यामुळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अधिक निधी राज्यांना उपलब्ध होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्टÑाला यावेळी एक रुपयाही मिळालेला नाही. केंद्र सरकारने अनुदान दिलेल्या राज्यांमध्ये केरळ (१२७१ कोटी), हिमाचल प्र्रदेश (९५२ कोटी), पंजाब (६३८ कोटी), आसाम (६३१ कोटी), आंध्र प्रदेश (४९१ कोटी), उत्तराखंड (४२३ कोटी) आणि पश्चिम बंगाल (४७१ कोटी) ही प्रमुख राज्ये आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीं नुसार केंद्राने अनुदानाचा पहिला हप्ता १४ मार्च रोजीच राज्यांना दिलेला असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.