CoronaVirus: लॉकडाऊन नेमका कसा हटणार?; मोदी सरकारकडून 'एक्झिट प्लान'वर काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 08:43 AM2020-04-28T08:43:40+5:302020-04-28T08:47:20+5:30
मोदींनी जाहीर केलेला दुसरा लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे.
नवी दिल्ली: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीस हजाराच्या आसपास पोहोचला आहे. वेळीच लॉकडाऊन केल्यानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बऱ्याच प्रमाणात यश आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना म्हटलं होतं. त्यामुळे ३ मेनंतरही लॉकडाऊन सुरू राहणार का, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. काल मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. राज्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता लॉकडाऊनच्या एक्झिट प्लानवर काम सुरू झालं आहे.
३ मेनंतर नेमकं काय करायचं याची योजना तयार करण्याचं काम मोदी सरकारनं सुरू केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेनंतरही सध्या लागू असलेले निर्बंध कायम राखले जाऊ शकतात. उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३ मेनंतर देशात लॉकडाऊन असेल. मात्र त्याचं स्वरुप पूर्ण स्वरुपाच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. कोरोनामुक्त भागांना (ग्रीन झोन) सरकार काही प्रमाणात सवलत दिली जाऊ शकते. लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये मात्र कठोर निर्बंध कायम राहतील. यामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद यासारख्या शहरांचा समावेश आहे. काल पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. मात्र काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काही सवलती देऊन लॉकडाऊन सुरू ठेवण्यात यावा, असं मत मांडलं. यामध्ये ईशान्येकडच्या राज्यांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. लॉकडाऊन पूर्णपणे हटवणं योग्य होणार नाही, अशी भूमिका या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली.
रेड झोनमधील विभागांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये नेण्याच्या दिशेनं काम करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या. लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. मात्र काही तज्ज्ञांनी येत्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असा इशारा दिल्यानं आपण सतर्क राहण्याची गरज आहे, अशी सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली.
मुंबईहून तब्बल १६०० किमी पायी चालला, गावी पोहोचल्यानंतर 4 तासांतच घडली दु:खद घटना
३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधानांचे संकेत
उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर तत्काळ नियुक्त करा!