CoronaVirus: होम आयसोलेशनवरून केंद्र सरकारने राज्यांना झापले; नियम बदलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 08:57 AM2020-06-20T08:57:52+5:302020-06-20T08:58:48+5:30
जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याला सर्रासपणे होम आयसोलेशन करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजारांवर पोहोचल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठविले असून एकाही रुग्णाला होम आयसोलेशन न करण्याची सूचना केली आहे.
जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यास त्याला सर्रासपणे होम आयसोलेशन करण्यात येत आहे. यामुळे कुटुंबातील सदस्य, शेजारच्या लोकांना कोरोना होण्याचा धोका वाढत आहे. खासकरून दाट वस्तींमध्ये हा धोका जाणवतो. यामुळे अशा भागातील रुग्णांना होम आयसोलेशन करू नये, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
यासाठी आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहू शकतो का याची खात्री करावी. तसेच या रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टरांती विशेष टीम तैनात करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
शहरी भागांमध्ये दाट लोकवस्ती आहे. यामुळे या भागांत होम आयसोलेशनची परवागी देण्यात येऊ नये. असे केल्यास त्याचा कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांना धोका उद्भवणार आहे. अशामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे, असे पत्रात म्हटले आहे.
दिल्ली सरकार अडचणीत
खासकरून दिल्ली सरकारला उद्देशून हे पत्र लिहिन्यात आले आहे. यामुळे दिल्लीमध्ये मोठे संकट उभे ठाकले आहे. दिल्लीमध्ये 10490 रुग्णांना होम आयसोलेट करण्यात आले आहे. या रुग्णांना कुठे ठेवावे असा प्रश्न आता दिल्ली सरकारला पडला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या निर्णयाला मनमानी कारभार असल्याचा आरोप केला असून कोरोनाविरोधातील लढ्यावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी या पत्रानंतर तातडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना होम आयसोलेशन बंद करण्याचे आदेश दिले. यामध्ये त्यांनी म्हटले की, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला पहिले पाच दिवस सक्तीचे सरकारी क्वारन्टाईन करावे लागणार आहे. यानंतरही जर त्याच्यामध्ये लक्षणे दिसली तर त्याचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच जर पाच दिवसांनंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली तरच होम आयसोलेशन करण्यात यावे. परत त्याच्यामध्ये कोरोना आढळल्यास त्याला सरकारने केलेल्या उपचारांच्या सोईच्या ठिकाणी दाखल करण्यात यावे असे म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक
आजचे राशीभविष्य - 20 जून 2020; मिथुन राशीच्या लोकांना आजार, अपघाताची शक्यता