CoronaVirus: स्थलांतरित कामगारांवर केंद्र तोडगा काढणार; राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:04 AM2020-04-19T02:04:18+5:302020-04-19T02:04:41+5:30
गृहमंत्रालय करू शकते दिशानिर्देश जारी
नवी दिल्ली : विविध राज्यात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्री समूहाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकांंच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यावर चर्चा केल्याचे राजनाथ सिंह यांनी नंतर सांगितले.
मंत्री समूहाने हे स्पष्ट नाही केले की, यासाठी काय मापदंड लावण्यात येणार आहेत. असे सांगितले जात आहे की, केंद्रीय गृहमंत्रालय या कामगारांबाबत नवे दिशानिर्देश घेऊन समोर येऊ शकते. या लोकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी सरकार एक अधिकृत सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह काही राज्यांचे मुख्यमंत्री हे विविध राज्यात अडकलेल्या कामगारांची सद्यस्थिती स्वीकारण्यास तयार नाहीत.
केंद्र सरकारला असे वाटते की, राज्यांनी यावर काही तोडगा शोधावा. कोटा येथून उत्तर प्रदेशात बस सेवेसाठी राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकार तयार झाले आहेत. अन्य राज्यही अशा काही उपाययोजना करण्याची तयारी करत आहेत.
केंद्राची मुख्य काळजी ही आहे की, खाणी, बंदरे, कार्गो संचलन, रस्ते निर्मिती आणि अन्य क्षेत्रातील कामासाठी कशाप्रकारे मनुष्यबळ उपलब्ध करता येईल.
कामगारांची माहिती एकत्रित करण्याचे निर्देश
केंद्रीय श्रम मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत की, स्थलांतरीत कामगारांचा एक डेटा तयार करण्यात यावा. राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि अन्य काही राज्ये अशाप्रकारे काम करत आहेत.
या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी श्रम मंत्रालयाने विविध राज्यात २० कंट्रोल रुम उभारल्या आहेत. मात्र, बहुतांश कॉल हे कामगारांना घरी जाण्याबाबतचे आहेत.
केंद्र सरकारला अशी काळजी आहे की, बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड येथील या कामगारांना परत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था कशी करावी? २५ दिवसांपासून लाखो कामगार विविध राज्यात फसले आहेत.