coronavirus: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी जनतेला होणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:07 PM2021-04-23T17:07:54+5:302021-04-23T17:23:30+5:30
coronavirus in India : कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून, या लाटेमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर इतरही काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचे, तसेच गोरगरिबांचे मोठ्या प्रमामात हात होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. (Central government's major decision against the backdrop of increasing coronavirus infection, 80 crore people will benefit Free Food)
देशातील अनेक राज्यात वाढलेला कोरोना आणि कोरोनाला रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत धान्याचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यांमध्ये गरीबांना प्रत्येकी पाच किलो धान्य दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ देशातील तब्बल ८० कोटी जनतेला होणार असून, यासाठी केंद्र सरकारने तब्बल २६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana for May & June 2021. 5 kg free food grains to be provided to around 80 crore beneficiaries. Government of India would spend more than Rs 26,000 crore on this initiative: Government of India
— ANI (@ANI) April 23, 2021
या निर्णयावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देश कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा सामना करत असताना हा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. सुमारे २६ हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च होणार आहेत.
दरम्यान, देशात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव अधिकच वाढत चालला आहे. आज देशभरात कोरोनाच्या ३ लाख ३२ हजार ७३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात देशभरात तब्ब्ल २२६३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभऱात १ लाख ९३ हजार २७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.