Coronavirus: केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा लांबणीवर; ३१ मे टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:09 PM2020-05-04T23:09:20+5:302020-05-05T06:51:11+5:30
२० मेनंतर आढावा घेऊन तारीख जाहीर केली जाणार
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवांसाठीची प्राथमिक परीक्षा (प्रिलिमनरी एक्झाम) पुढील सूचना दिली जाईपर्यंत लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसार ३१ मे रोजी होणार होती.
युपीएससीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २० मेनंतर परिस्थितीचा अभ्यास करून नवी तारीख ठरवली जाईल. सोमवारी आयोगाची बैठक अरविंद सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पूर्व नियोजित तारीख पुढे ढकलण्यासाठीच्या या बैठकीला आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने चार मेपासून लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवल्यानंतर परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. जे काही करणे आवश्यक होते ते केंद्रीय लोकसेवा आयोगाने केले, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या अधिकाºयाने सांगितले. आज कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणे योग्य नाही. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लॉकडाऊननंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नवी तारीख निश्चित केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला. कोरोना विषाणू महामारीचा होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनचे निर्बंध विचारात घेऊन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे लोकसेवा आयोगाच्या आणखी एका अधिकाºयाने सांगितले. नवीन तारीख २० मेनंतर जाहीर केली जाईल. आयोग विद्यार्थ्यांना या आठवड्यात अॅडमिट कार्डस देणार होते. परंतु, आता त्याने लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे ती प्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.
दरवर्षी दहा लाख विद्यार्थी करतात नोंदणी
दरवर्षी जवळपास १० लाख विद्यार्थी नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी नाव नोंदणी करतात. जवळपास १.६ लाख पदाधिकारी अडीच हजार केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे काम करतात. हरयाणा नागरी सेवांसारख्या इतर अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा ज्या पाच जूनपासून घेतल्या जाणार होत्या त्यादेखील लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.