coronavirus: देशांतर्गत विमानसेवा शुक्रवारपूर्वी सुरू करण्याचा केंद्राचा विचार - हरदीपसिंग पुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:32 AM2020-05-11T01:32:41+5:302020-05-11T01:33:39+5:30
देशांतर्गत विमानसेवा शक्यतो लवकर सुरू करावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारांनी केंद्राला सहकार्य करणे आवश्यक आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.
नवी दिल्ली : ‘कोविड-१९’ साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा परिस्थितीत सुधारणा झाल्यास येत्या शुक्रवारपूर्वी पुन्हा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
यासंदर्भात केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, देशांतर्गत विमानसेवा शक्यतो लवकर सुरू करावी, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य सरकारांनी केंद्राला सहकार्य करणे आवश्यक आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे.
देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही नियम पाळून लोकांना प्रवास करता येईल. देशातील ग्रीन झोनमध्ये ही सेवा सुरू करणे हे तुलनेने सोपे आहे. या साथीच्या काळात सर्व महानगरे रेड झोनमध्ये आहेत. तसे असले तरी तिथे सर्वच गोष्टी बंद ठेवून चालणार नाही, असे पुरी यांनी नमूद केले.
देशभर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी हवाईमार्गे होणारी मालवाहतूक तसेच अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात नेण्यासाठी किंवा विदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्याकरिता विशेष विमानांचा उपयोग केला जात आहे. हे वगळता सर्व प्रवासी वाहतूक बंदच आहे.
अधिकाऱ्यांची चर्चा सुरू
देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची प्रकिया कशा पद्धतीने राबविली जावी, याविषयी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे अधिकारी सध्या विचारविनिमय करत आहेत.
४कोरोना विषाणूच्या साथीचा मोठा तडाखा बसलेल्या क्षेत्रांमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचाही समावेश आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली आहे.