CoronaVirus: मायदेशाच्या मदतीला धावले दोन बड्या कंपन्यांचे सीईओ; पिचाई, सत्या नाडेला यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 06:03 AM2021-04-27T06:03:32+5:302021-04-27T06:41:33+5:30
नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना विविध ठिकाणांहून मदत येत आहे. त्यातच जगातील दोन मोठ्या कंपन्यांच्या सीईओंनी ...
नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाचे संकट वाढत असताना विविध ठिकाणांहून मदत येत आहे. त्यातच जगातील दोन मोठ्या कंपन्यांच्या सीईओंनी या संकटकाळात आपल्या मायदेशाला मदत करण्यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. गुगलचे सीईओ असलेले सुंदर पिचाई यांनी १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीही भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ऑक्सिजन उपकरणे खरेदीसाठी कंपनी भारताला मदत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रकोप झाला असून त्यामुळे देशभर रुग्णांची मोठी संख्या आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्राकडे असलेली साधनसामग्री अपुरी पडत असून ऑक्सिजनचीही टंचाई जाणवत आहे. जगातील अनेक देशांनी भारताला मदत दिली आहे.
देशातील गंभीर स्थितीची जाणीव होताच भारतीय असलेले दोन प्रमुख कंपन्यांचे सीईओही आपापल्या कंपनीच्या माध्यमातून मायदेशाला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.
गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांनी १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. गुगल युनिसेफ आणि गेट इंडिया यांच्यामार्फत ही मदत पुरविणार आहे. गेट इंडियाच्या मार्फत संकटग्रस्तांना आपला दैनंदिन खर्च भागविता यावा यासाठी रोख स्वरूपात मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर युनिसेफच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि चाचणी उपकरणांसह वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय गुगलचे वैद्यकीय पथकही भारताला सर्व ती मदत करऱ्यासाठी सज्ज असल्याचे पिचाई यांनी सांगितले. एका ट्वीटद्वारे त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ असलेल्या सत्या नाडेला यांनीही ट्वीट करून भारतामधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. या कठीणप्रसंगी भारताला सर्व ती मदत करऱ्यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाला आज ऑक्सिजन आणि त्यासाठीच्या उपकरणांची सर्वाधिक गरज असून ती पूर्ण करऱ्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्रांच्या खरेदीसाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गुगलतर्फे १३५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यातील काही मदत ही रोख स्वरूपात तर काही मदत ही वैद्यकीय उपकरणांच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. मायक्रोसाॅफ्टनेही भारताला शक्य ती सर्व मदत देण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुख्यत: ऑक्सीजनसाठीची उपकरणे ही खरेदी करून पुरविली जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.