CoronaVirus: कोरोना महामारीचा फटका; चार धाम यात्रा रद्द, 14 मेरोजी होणार होती सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:51 PM2021-04-29T12:51:56+5:302021-04-29T12:53:15+5:30
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले, कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मेरोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरू होणार होती.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा (Char dham yatra) रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 14 मेरोजी सुरू होणार होती. यात्रा रद्द करण्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माहिती दिली. यात्रा रद्द करण्यासंदर्भात रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. केवळ पुजाऱ्यांनाच तेथे पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चारधाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे. (CoronaVirus Char dham yatra cancelled due to Covid-19)
'कोरोना काळात शक्य नाही' -
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत म्हणाले, कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मेरोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरू होणार होती. उत्तराखंड सरकारने गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा रद्द केली होती. यानंतर राज्य सरकारने एक जुलैपासून श्रद्धाळूंसाठी चारधाम यात्रा सुरू केली होती. तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही सरकारने काही अटींसह परवानगी दिली होती.
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878 रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.
रशियानं पाठवली मदतीची दोन विमानं -
देशात नव्या कोरोना बाधितांची आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. अशा या संकट काळात, जगभरात भारताचा जिगरी मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने भारताच्या मदतीसाठी दोन विमानं पाठवली आहेत. ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली आहेत. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर ऑषध पाठवले आहे.
हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा... -
उत्तर प्रदेशातील कोरोना स्थितीवरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ सरकारला फटकारले आहे. यावेळी, यूपी पंचायत निवडणुकीत कोरोना गाइडलाइनचे पालन का केले गेले नाही? असा सवालही न्यायालयाने केला आहे. याच बरोबर, न्यायालयाने योगी सरकारला 'हात जोडून', राज्यातील मोठ्या शहरांत 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लावण्यात यावा, असा सल्लाही पुन्हा एकदा दिला आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने राज्यातील पाच मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला होता.