CoronaVirus: रॅपिड टेस्टिंग किटमधील दोष दूर करण्याची चीनने दर्शविली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 02:12 AM2020-04-23T02:12:45+5:302020-04-23T02:13:07+5:30
भारतात तीन लाख संच; आयसीएमआरने दाखविल्या त्रुटी
बिजिंग : कोरोनाची चाचणी करण्यासाठी चीनमधून भारतात आणलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचे निष्कर्ष चुकीचे येत असल्याचे उजेडात आल्यानंतर चीनने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या किटमधील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करू, असे त्या देशाने म्हटले आहे. चीनचे भारतातील राजदूत जी रोंग यांनी सांगितले, की चीनमध्ये बनलेल्या व निर्यात केलेल्या वैद्यकीय उपकरणाचा दर्जा उत्तमच असावा, यावर आमच्या देशाचा कटाक्ष असतो.
चीनमधून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचे निष्कर्ष चुकीचे येत असून ते काही दिवस वापरणे थांबवावे, असा सल्ला इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रीसर्च (आयसीएमआर) या संस्थेने विविध राज्यांना दिला आहे. या संदर्भात आयसीएमआरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, की रॅपिड टेस्ट किटच्या पॉझिटीव्ह सॅम्पलच्या निष्कर्षातील आकडेवारीत ६ ते ७१ टक्के इतकी तफावत आढळून येत आहे. एका राज्याकडून तक्रार येताच आयसीएमआरने आणखी ३ राज्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनीही रॅपिड टेस्ट किटचे निष्कर्ष चुकीचे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आयसीएमआरच्या तज्ज्ञ मंडळींची पथके पाठवून या किटची दोन दिवसांत नीट तपासणी करण्यात येईल. (वृत्तसंस्था)
ब्रिटन, स्पेनने केली तक्रार
चीनमधील ग्वांगझूयेथून ३ लाख अँटिबॉडी टेस्ट किट एअर इंडियाच्या विशेष विमानाने १८ एप्रिल रोजी भारतात आणण्यात आले. त्यानंतर ते राजस्थान व तमिळनाडूमध्ये रवाना करण्यात आले. भारतच नव्हे तर स्पेन, ब्रिटन आदी देशांनीही चीनचे रॅपिड टेस्टिंग किट सदोष असल्याचा आरोप केला होता.