कोरोनाच्या भारताला झळा; चीनमधून होणाऱ्या आयातीला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:48 AM2020-02-28T04:48:43+5:302020-02-28T04:49:56+5:30
जेएनपीटीत येणाऱ्या जहाजांचा प्रवास थांबला
मुंबई : चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या (कोविड-१९) थैमानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला झळा पोहोचण्याचे संकेत मिळत असतानाच चीनच्या बंदरातून येणाºया चार मालवाहू जहाजांचा प्रवास रद्द करत असल्याचे जेएनपीटीला सांगण्यात आले आहे. भारतात १२ मोठी आणि १२५ छोटी बंदरे आहेत. तेथेही चिनी वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणात होते. येत्या काही दिवसांत ती लक्षणीयरीत्या रोडावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशात चिनी वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल.
जेएनपीटी येथे जेएनपीटीसीसह डीबी वर्ल्डचे एनएसआयसीटी आणि एनएसआयजीटी, मर्स्कचे एपीएमटी, सिंगापूर पीएसएचे बीएमसीटी अशी टर्मिनल आहेत. १६ टक्के वाटा जेएनपीटीसीचा आहे. तेथे अपेक्षित असलेल्या चार मालवाहतूक जहाजांनी प्रवास रद्द केल्याचे आम्हाला कळविले आहे, अशी माहिती जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. पीएसए टर्मिनल येथे चीन येथून सर्वाधिक आयात होते. मात्र, त्यांनी तूर्त जहाज रद्द झाल्याबाबतची कोणतीही माहिती आम्हाला दिलेली नाही. काही घटना या आपल्या नियंत्रणात नसतात. त्यामुळे कोरोनाचा किती फटका बसेल याबाबत तूर्त कोणताही अंदाज व्यक्त करता येणार नाही. येत्या तीन-चार आठवड्यांमध्ये त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही सेठी यांनी सांगितले.
भारतात आयात होणारा १८ टक्के माल हा चीनमधून दाखल होत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांह उद्योगांनाही कोरोनाची झळ सोसावी लागेल, अशी भीती जेएनपीटीच्या एका अधिकाºयाने व्यक्त केली. या विषयावर इंटरनॅशनल मेरीटाइम आॅर्गनायझेशनसोबत चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.