Coronavirus: चिनी रॅपिड टेस्ट कीटस्; ५ लाख कीट्सच्या वादाचं प्रकरण सीबीआयकडे सोपविणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:17 PM2020-05-04T23:17:04+5:302020-05-05T06:50:50+5:30
चौकशीचे दिले आदेश?
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निदान करण्यासाठी चीनमधील दोन कंपन्यांकडून आयात करण्यात आलेले सदोष ५ लाख जलद रक्तद्रव्य चाचणी संचावरून (रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस्) मोठा वाद उफाळला आहे. घोटाळ्यासह खरेदी प्रक्रिया आणि दरावरूनही आरोप होत असल्याने हे प्रकरण सीबीआयच्या हाती जाण्याची शक्यता आहे. भारतीय औषधी महानियंत्रकांनी या पहिल्या वैद्यकीय घोटाळ्याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिलेले आहेत.
भारतीय मध्यस्थांमार्फत या कीटस्चा पुरवठा करणाऱ्या दोन चिनी कंपन्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) काळ्या यादीत टाकले असले तरी हे कीटस् खरेदीसाठी २४ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या निविदेत आयसीएमआरने नवीन उपकलम समाविष्ट केल्याचे समोर आले आहे.
चौकशीतून आढळले की, आयसीएमआरने भारतीय वितरकांकडून पुरवठा करणाºया कोणत्याही कंपन्यांकडून ५ लाख कीटस्चा पुरवठा करण्यासाठी निविदा मागावल्या होत्या; परंतु ११ एप्रिल रोजी आणखी ४५ लाख कीटस्साठी दुसरी निविदा काढताना निविदाकर्त्यांसाठी आयात परवान्याची पूर्वअट घातली. एकाच प्रकारच्या कीटस्साठी दोन वेगवेगळे कलम कशासाठी? ४५ लाख कीटस् खरेदीबाबत काय झाले? याचा कोणालाही थांगपत्ता नाही; परंतु ५ लाख चिनी रॅपिड अॅन्टीबॉडी टेस्ट कीटस् खरेदीचा घोटाळा बनला. पहिल्या निविदेतहत एकूण १६ कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सात कंपन्या चीनच्या होत्या, तर ९ भारतीय पुरवठादार होते.
गुआंगझोऊ वोंडफोन बायोटेक अणि झुहाई लिवझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन चिनी कंपन्यांकडून २४५ रुपये या दराने आयात करण्यात आलेले कीटस् वितरकांना ४२० रुपयांना विकण्यात आले. वितरकांनी हे कीटस् आयसीएमआरला ६०० रुपयांप्रमाणे विकल्याचे समोर आले आहे.
आयसीएमआरने हे कीटस् आयात करण्यास मंजुरी दिल्यानंतर अनेक राज्यांनी मोठ्या प्रमाणावर कीटस् खरेदी केली होती. तामिळनाडू, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगालने चिनी कीटस् खरेदी केली होत्या. या उलट छत्तीसगढने दक्षिण कोरियाच्या एस. डी. बायोसेन्सर कंपनीकडून थेट प्रति कीटस् ३७७ रुपये दराने म्हणजे चिनी कीटस्च्या निम्म्या किमतीत खरेदी केली.
चीनच्या उपरोक्त दोन कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या कीटस्चा वापर न करण्याचे आणि ते पुरवठादारांना परत करण्याचा सल्ला आयसीएमआरने राज्यांना दिलेला आहे. तथापि, उर्वरित चिनी वितरकांना प्रतिबंध केलेला नाही.
४८०० भारतीय सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित
सिंगापूर : सिंगापूरमध्ये जवळपास ४८०० भारतीय नागरिक हे एप्रिल महिनाअखेर कोरोना विषाणूच्या चाचणीत सकारात्मक आढळले. यातील बहुतेक जण हे विदेशी कामगारांसाठीच्या डॉर्मिटरीजमध्ये राहतात. ही माहिती सोमवारी येथील भारतीय उच्चायुक्तालयाने दिली. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांची एकूण संख्या १८,२०५ असून, १८ जणांचा मृत्यू झाला, असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. भारतीय कामगारांना झालेली बाधा ही सौम्य असून, त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त जावेद अशरफ यांनी सांगितले.