coronavirus: गुजरातमधील सूरत येथे मजुरांकडून पुन्हा गोंधळ, पोलिसांवर केली दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 04:25 PM2020-05-04T16:25:47+5:302020-05-04T16:28:00+5:30
गुजरातमधील सूरत येथे गावी जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मजुरांनी आज पुन्हा एकदा गावी पाठवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला.
सूरत - लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिता आणण्यात आल्यानंतर देशातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या दरम्यान, गुजरातमधील सूरत येथे गावी जाण्यासाठी इच्छूक असलेल्या मजुरांनी आज पुन्हा एकदा गावी पाठवण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. या मजुरांच्या जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेकही केली. अखेरीस या मजुरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
गुजरातमधील सुरत येथे अजूनही शेकडो मजूर अडकून पडलेले आहेत. हे मजूर आपल्याला गावी पाठवण्यात यावे, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, आज या मजुरांनी आपल्याला लवकरात लवकर गावी पाठवावे अशी मागणी करत गोंधळ घातला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सूरत येथे जमावाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती.
#WATCH Gujarat: A clash erupts between migrant workers & police in Surat. The workers are demanding that they be sent back to their native places. pic.twitter.com/aiMvjHGukY
— ANI (@ANI) May 4, 2020
दरम्यान, कोरोनामुळे सर्वाधित प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये काल ३७४ रुग्ण सापडले. त्यामुळे गुजरातमधील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ४२८ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहेत. पैकी ११ हजार ७०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १३७२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात सध्याच्या घडीला कोरोनाचे २९ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.