CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी दिलेलं 'ते' उदाहरण पंतप्रधानांना आवडलं; बैठकीच्या शेवटी मोदींकडून खास उल्लेख
By कुणाल गवाणकर | Published: September 23, 2020 09:37 PM2020-09-23T21:37:33+5:302020-09-23T21:40:23+5:30
CoronaVirus News: पंतप्रधान मोदींचा देशातील सात मुख्यमंत्र्यांशी संवाद; कोरोना संकटावर चर्चा
मुंबई: देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५६ लाखांच्या पुढे गेला आहे. दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचादेखील समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधण्यात आलेल्या या संवादात मोदींनी नव्या रणनीतीवर भर देण्यास सांगितलं.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात राबवण्यात येत असलेल्या 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' योजनेची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. माझं कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितलं. राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतरदेखील रुग्णांना वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रं सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
#WATCH It is difficult to make wearing masks a habit, but we will not be able to get the desired results if we don't make it a part of our daily life, says PM Modi in a meeting with Chief Ministers of seven states pic.twitter.com/V9m7KAzRgG
— ANI (@ANI) September 23, 2020
महाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान
यावेळी पंतप्रधानांनीदेखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकाना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.
Effective messaging is also necessary because most #COVID19 infections are without symptoms. In such a situation, rumours may rise. It might raise doubts in the minds of the people that testing is bad. Some people also make mistake of underestimating the severity of infection: PM https://t.co/XaJbSnfXMo
— ANI (@ANI) September 23, 2020
मुख्यमंत्र्यांनी दिलं चष्म्याच्या सवयीचं उदाहरण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मास्क प्रभावी ठरतो. त्यामुळे मास्क आता सवयीचा भाग व्हायला हवा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली. त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार. पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की, आज त्याचा त्रास होत नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिलेलं चष्म्याचं उदाहरण पंतप्रधानांना आवडलं. त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असं सांगितलं.